मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील सोनवी पूलाचे काम रखडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हा चर्चेचा विषय असताना संगमेश्वरच्या दुतर्फा असणारे आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रातील काम गेली आठ वर्षे रखडलेले आहे. अशातच संगमेश्वर येथील सोनवी पूलाचे काम पावसाळ्यापूर्वी दोन महिने सुरु झाले. मात्र, नदीतील पायाचे चार खांब वर आल्यानंतर पुढील कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. ऑक्टोबरनंतर पाऊस कमी झाला तरीही सोनवी पूलाचे काम सुरु न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे .

ब्रिटिश राजवटीत 1934 साली उभारण्यात आलेल्या सोनवी पूलावर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पूलासह दोन्ही बाजूला खड्डे पडलेले असल्याने वाहने मंदगतीने पुढे सरकत असतात. या पूलाला 86 वर्षे उलटून गेल्याने अवजड वाहने पूलावरुन जात असताना पूल हलतो. परिणामी समोर वाहन येताना पाहून पादचारी वेगाने पूलाच्या पलीकडे येण्याचा प्रयत्न करतात. त्यातच पूलावर खड्डे पडलेले असल्याने वाहनचालक खड्डे वाचविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा परिस्थितीत एखादा गंभीर अपघात घडण्याची भिती पादचारी आणि संगमेश्वर तसेच माभळे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे .

पावसाने पूर्णत: नसली तरी विश्रांती घेऊन महिना होत आला तरीही सोनवी पूलाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. पूलाचे काम सुरु करण्याबाबत कोणतीही हालचाल याठिकाणी दिसून येत नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनी येत्या दीड वर्षात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्याचा दावा नुकताच केला आहे. सोनवी पूलावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून पूलाला असणारा धोकाही वाढत आहे. अशा स्थितीत दोन बाजूंना होणाऱ्या नव्या दोन सोनवी पूलांची कामे अद्याप सुरु न झाल्याने यावर्षी देखील नवीन सोनवी पूल पूर्ण होवू शकणार नाही अशीच परिस्थिती सध्यातरी दिसून येत आहे.