अवघे 5500 रुपये घेऊन मुंबईत आला होता सोनू सूद! आता ठरतोय मजुरांसाठी देवदूत

1571

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्यावर सध्या जनसामान्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईत अडकून पडलेल्या अनेक मजूर कुटुंबांना घरी जाण्यासाठी त्याने बसेसची सोय करून दिली आहे. त्यामुळे त्याच्या या कामासाठी आणि मजुरांसाठीच्या संवेदनशीलतेमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. पण, ही संवेदनशीलता असलेला आणि मजुरांसाठी लाखो रुपये खर्च करणारा सोनू एकेकाळी स्ट्रगलर म्हणून मुंबईत दाखल झाला होता आणि खूप प्रयत्न व मेहनतीच्या साहाय्याने आज त्याने आपलं नाव कमावलं आहे.

सोनू सूदने एका मुलाखतीत आपल्या उमेदवारीच्या दिवसांचा प्रवास उलगडला आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात दिल्लीतून झाली. तिथे त्याने काही काळ मॉडेलिंग केलं. त्याचा विचार होता की, काही पैसे जमवून तो मुंबईत दाखल होईल आणि तिथे आपला जम बसवण्याची खटपट करेल. दीड वर्षं मॉडेलिंग केल्यानंतर त्याने जवळपास साडेपाच हजार रुपये जमा केले आणि तो मुंबईत दाखल झाला. त्याला वाटलं होतं की, हे पैसे महिनाभर पुरतील. पण, मुंबईत ते पैसे जेमतेम पाच सहा दिवसच पुरले. पैसे संपत आल्यानंतर त्याला घरून मदत घ्यावी लागेल, असं वाटू लागलं.

अचानक चमत्कार व्हावा तसं काहीसं घडलं आणि त्याला मुंबईत पहिलं काम मिळालं. एका जाहिरातीसाठी त्याला फोन आला आणि त्याला दोन हजार रुपये प्रतिदिन इतका मोबदला मिळेल, असं सांगण्यात आलं. त्या जाहिरातीच्या आठवणीत रमताना सोनू म्हणाला की, मला वाटलं होतं की माझ्याकडे या जाहिरातीच्या माध्यमातून निर्माता आणि दिग्दर्शकाचं लक्ष जाईल. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मला लक्षात आलं की माझ्यासारखेच अजून 10-12 जण तिथे होते. मी त्या जाहिरातीत पाठी कुठेतरी ड्रम वाजवत होतो आणि दिसत देखील नव्हतो.

खूप प्रयत्नांनंतर त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं. बॉलिवूडमध्ये उमेदवारी करताना त्याला नेहमी वाटायचं की, लोकांनी त्याची मदत करावी. पण, कुठल्याही कलाकाराने त्याला मदत केली नाही. उलट इथे वावरणारा प्रत्येक जण त्याला परत जायला सांगायचा. त्यामुळे उमेदवारी करायला आलेल्या कुठल्याही स्ट्रगलर व्यक्तिला मी भेटीसाठी कधीच नाही म्हणत नाही. जरी एखाद्या माणसाकडे अभिनय कौशल्य नसेल, तरीही मी त्याला कधीच निराश करत नाही, असंही सोनूने या मुलाखतीत म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या