‘त्या’ बोगस मतांचा भाजपला फायदा होणार होता का?

विरोधकांच्या मतदारसंघात मुस्लिमांची दुबार नावे असून त्यावर काहीही बोलले जात नाही. विरोधकांना केवळ हिंदूंचीच दुबार नावे दिसतात, असा आरोप भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केला होता. त्याचा खरपूस समाचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी घेतला आहे. मतदार याद्यांमध्ये मुस्लिम दुबार मतदारांची नावे असल्याचे भाजपने मान्य केले असून ‘त्या’ बोगस मतांचा भाजपला फायदा होणार होता काय, असा सवाल दिघे यांनी एक्स पोस्टवरून केला आहे.

केदार दिघे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुस्लिम मते भाजपला मिळत नाहीत असे भाजपचेच म्हणणे आहे. दुसरीकडे त्यांच्या नेत्यांचा मतदार यादीवरील अभ्यासही खूप आहे. मग मुस्लिम दुबार मते आहेत हे माहीत असतानाही निवडणूक आयोगाला सांगून ती नावे वगळली का नाहीत?

भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना केदार दिघे यांनी सांगितले की, ती नावे कट केली नाहीत, याचा अर्थ त्या दुबार किंवा बोगस मतांचा भाजपाला फायदा होईल असे त्यांना वाटत होते का? ओरिजनल मते मिळणार नाहीत म्हणून ही दुबार नावे कुणी टाकली होती का? त्यामागे सत्य काय आहे, असा प्रश्न दिघे यांनी विचारला.

राजकारण आणू नका

दुबार मतदारांच्या विषयात कुणीही धार्मिक राजकारण न आणता यादीतील सर्वच दुबार नावे वगळावीत, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.