दोन हाय-स्पीड ट्रेनचा भीषण अपघात; २१ प्रवाशांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंदालुसिया प्रांतात रविवारी संध्याकाळी दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून ७३ जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत देशाला ‘मोठ्या वेदनेची रात्र’ असल्याचे म्हटले आहे.

स्पेनच्या ‘अदलिफ’ (Adif) रेल्वे नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार, मालागा येथून माद्रिदकडे जाणारी एक वेगवान ट्रेन अदामुझ शहराजवळ रुळावरून घसरली आणि दुसऱ्या ट्रॅकवर गेली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला तिची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरून खाली कोसळले. काही डब्बे तर ४ मीटर खोल दरीत कोसळल्याचे प्रशासनाने सांगितले.

रेल्वेच्या डब्यांचा चेंदामेंदा झाल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या कष्टाचा सामना करावा लागला. जखमींपैकी ३० जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कराची मदतही बचावकार्यासाठी घेण्यात आली असून ४० जवान घटनास्थळी तैनात आहेत.

विचित्र अपघात

स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुंते यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रेल्वे ट्रॅक पूर्णपणे नूतनीकरण केलेला होता आणि गाड्याही नवीन होत्या. त्यामुळे अशा सुरक्षित ट्रॅकवर हा अपघात कसा झाला, याचे आश्चर्य व्यक्त केले जात असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातामुळे माद्रिद, सेव्हिल आणि मालागा दरम्यानची रेल्वे वाहतूक सध्या स्थगित करण्यात आली आहे.