स्पेनमध्ये सहा महिन्यांचा लॉकडाऊन संपला, रस्त्यावर उतरून नागरिकांची पार्टी

अनेक देशांप्रमाणे स्पेन या देशालाही कोरोनाचा विळखा बसला होता. त्यामुळे गेले सहा महिने तिथे रात्रीचा लॉकडाऊन लावण्यात येत होता. हा लॉकडाऊन संपत असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यानंतर तेथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पार्टी साजरी केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रात्रीच्या वेळी कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, नुकताच तो संपल्याची घोषणा करण्यात आली. स्पेनमध्ये नाईट कल्चर बऱ्यापैकी रुजलेलं आहे. त्यामुळे रात्री लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हा लॉकडाऊन संपल्याची घोषणा होताच स्पेन, माद्रिद येथे तमाम नागरिकांनी रस्त्यावर उतरून दारूच्या पार्ट्या केल्या. यात बहुतांश तरुणांचा समावेश होता. या पार्ट्यांवेळी बहुतेकांनी मास्क घातलेला नव्हता.

मात्र, लॉकडाऊन संपलं तरी कोरोनाचा संसर्ग संपलेला नाही. त्यामुळे तेथील तज्ज्ञांनी या जाहीर पार्ट्यांना विरोध केला आहे. काही ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये या पार्ट्यांमुळे हाणामारीही झाली.

स्पेनच्या बऱ्याचशा भागात लॉकडाऊन हटवण्यात आला असला तरी काही संवेदनशील क्षेत्रात अद्यापही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या