
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पेनने एक मोठा निर्णय घेत अमेरिकेला धक्का दिला आहे. इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या अमेरिकन विमानांसाठी स्पेनने आपली हवाई हद्द (Airspace) पूर्णपणे बंद केली आहे. इतकेच नाही तर, स्पेनने त्यांच्या देशातील संयुक्त लष्करी तळांचा वापर करण्यासही अमेरिकेला मज्जाव केला आहे.
संरक्षण मंत्री मार्गारिटा रोब्लेस यांनी सोमवारी माद्रिद येथे पत्रकारांशी बोलताना या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. “इराणमधील युद्धाशी संबंधित कोणत्याही लष्करी कारवाईसाठी आम्ही आमचे लष्करी तळ किंवा हवाई हद्द वापरण्याची परवानगी देणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
स्पेनचे अर्थमंत्री कार्लोस कुएर्पो यांनी सांगितले की, हे युद्ध ‘एकतर्फी’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अशा युद्धात सहभागी न होण्याचे धोरण स्पेन सरकारने स्वीकारले आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचे वर्णन ‘बेजबाबदार आणि बेकायदेशीर’ असे केले आहे. स्पेनच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. त्यांनी स्पेनला आर्थिक परिणामांचा इशारा दिला असून, माद्रिदसोबतचा व्यापार तोडण्याची धमकी दिली आहे. लष्करी तळांना प्रवेश नाकारल्यामुळे अमेरिका आणि स्पेनमधील राजनैतिक संबंध आता ताणले जाण्याची शक्यता आहे.
नाटो (NATO) सदस्य असूनही विरोध
स्पेन हा नाटोचा सदस्य देश असूनही त्यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवायांना सहकार्य करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता अमेरिकन विमानांना मध्यपूर्वेकडे जाताना स्पेनला मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.























































