
मुंबईतून गायब होत चाललेल्या चिमण्या वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत छोटय़ा दोस्तांना स्वतःची कहाणी सांगण्यासाठी ती दादरच्या नारळी बाग पालिका उद्यानात अवतरली आहे. प्रमोद माने यांच्या स्पॅरोज शेल्टर या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय.
मुंबईत विविध पक्षी आढळतात. मात्र यात लहानपणापासून सर्वांच्या परिचयाची असलेली चिऊताई मुंबईतून हद्दपार होताना दिसत आहे. मुंबईतून चिमणी नामशेष होऊ नये, तिच्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिका चिमणीचा परिचय बच्चे कंपनी आणि मोठय़ांनाही व्हावा यासाठी जास्त वर्दळ असलेल्या काही निवडक उद्यानांमध्ये चिमणीचे शिल्प टप्याटप्याने ठेवण्यात येणार आहे. याची सुरुवात दादरच्या नारळी बाग येथून झाली. चिमणीचे हे शिल्प पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवण्यात आले आहे. चिमणी शिल्पावर चिमण्यांची संख्या कमी होण्याची कारणे आणि त्यावरील उपययोजनांबाबत माहिती देण्यात आली आहे.
चिमण्या या झाडांवरील कीटक, किडे आणि वाळवी खातात. झाडांच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी हा आपला छोटा जीव करत असतो. ऑक्सिजनमुळे झाडांचे महत्त्व तर सर्वांना पटले आहे तसे महत्त्व या छोटय़ा जिवाचेही पटणे खूप महत्त्वाचे आहे.
> प्रमोद माने, प्रमुख, स्पॅरोज शेल्टर

























































