International Tea Day : एक कप चहा आणि नात्यांना मिळतो गोडवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

‘चहाला वेळ नसते… तर वेळेला चहा असतो’ असे म्हणत प्रत्येक हिंदुस्थानीची आपल्या दिवसाची सुरुवात करतो. सकाळच्या पहिल्या घोटापासून ते मैफिलीतील गप्पांपर्यंत, प्रवासातील थकव्यापासून ते नात्यांतील गोडव्यापर्यंत चहा प्रत्येक क्षणाचा साथीदार बनला आहे. २१ मे रोजी जगभरात ‘जागतिक चहा दिन’ साजरा केला जात असून, या निमित्ताने चहाचा इतिहास, महत्त्व आणि हिंदुस्थानींच्या जीवनातील त्याचे स्थान पुन्हा अधोरेखित होत आहे.

चहा हे पेय केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे. कथेनुसार, इसवी सनपूर्व २७०० मध्ये चीनचा सम्राट शेनॉन्ग उकळते पाणी पीत असताना त्यात नकळत एक पान पडले आणि पाण्याला वेगळी चव आली. त्यातूनच चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. आजही चीन हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे.

हिंदुस्थानात चहाचा प्रसार ब्रिटिशांच्या काळात झाला. १८३६ मध्ये इंग्रजांनी आसाममध्ये पहिली चहाची बाग सुरू केली आणि त्यानंतर देशात चहाचा व्यापार झपाट्याने वाढला. दार्जिलिंग, आसाम, निलगिरी, कांगडा, केरळ, तामिळनाडू अशा भागांतील हिंदुस्थानीय चहाला आज जगभरातून मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात उत्पादित होणाऱ्या चहापैकी तब्बल ८० टक्के चहा देशातच सेवन केला जातो.

आज चहा हा फक्त पेय राहिलेला नाही, तर तो हिंदुस्थानीय संस्कृतीचा भाग बनला आहे. पूर्वी पाहुण्यांना गुळपाणी देण्याची परंपरा होती, त्याची जागा आता चहाने घेतली आहे. गावातील टपरीपासून शहरातील अमृततुल्यपर्यंत लाखो लोकांना चहामुळे रोजगार मिळत आहे.

आलं टाकलेला कडक चहा, वेलदोड्याचा सुगंध, गवती चहाची चव, तरुणाईत लोकप्रिय होत असलेला ग्रीन टी, हर्बल टी आणि लेमन टी… चहाचे अनेक प्रकार आज लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.

जागतिक चहा दिन साजरा करण्यामागे चहा मळ्यातील कामगारांच्या समस्या, चहाच्या व्यापाराची व्याप्ती आणि उत्पादनाशी संबंधित प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधणे हा मुख्य उद्देश आहे. हिंदुस्थानाच्या पुढाकारानंतर संयुक्त राष्ट्र संघाने २१ मे हा ‘जागतिक चहा दिन’ म्हणून घोषित केला.

एक कप चहा अनेकदा तुटलेली नाती जोडतो, मनातील कटुता दूर करतो आणि गप्पांना रंगत आणतो. म्हणूनच चहा हा फक्त पेय नाही, तर भावना जोडणारा धागा आहे.

“आनंदाच्या प्रत्येक घोटाचा आस्वाद घ्या… सर्व चहा प्रेमींना जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा!”