
सामना ऑनलाईन, मुंबई
पाऊस तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी शुक्रवारी जाहीर केले. या सुट्टीच्या काळात परीक्षा येत असल्यास विद्यार्थ्यांच्या सोईसाठी फेरपरीक्षा होणार असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.
26 व 27 जुलैला बदलापूर-कर्जत भागात मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहचू शकले नाहीत. यामध्ये दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीच्या विज्ञान भाग-2, इतिहास, समाजशास्त्र तर बारावीच्या समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परीक्षा विद्यार्थ्यांना देता आल्या नाहीत. त्या परीक्षा पुन्हा घेण्याच्या सूचना शिक्षणमंत्री शेलार यांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.




























































