
स्पाइसजेटच्या फ्लाइटला विलंब झाल्यामुळे, दिल्ली विमानतळावर प्रवाशी संतापले होते. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एअरपोर्टवरच निषेध नोंदवला. एका प्रवाशाने तर बोर्डिंग गेटजवळच निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले.
विमानाच्या उड्डाणाची वेळ सतत रद्द झाल्यामुळे, अनेक प्रवाशांनी बोर्डिंग गेटवरच ठिय्या मांडला. गुरुवारी दुपारी 1.10 वाजता एसजी 9213 हे विमान अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. परंतु त्या विमानाची वेळ ही दुपारी 3.40 करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी 6.40 नंतर 7.30, रात्री 8.30 आणि नंतर रात्री 9.30 अशी करण्यात आली. त्यामुळे विमान तब्बल 8 तास लेट झाले होते.
अखेर रात्री 9.30 च्या सुमारास उशिरा विमानाचे उड्डाण झाले. स्पाइसजेटने सांगितले की, ऑपरेशनल समस्यांमुळे हा विलंब झाला होता. तसेच यासंदर्भातली सर्व माहिती ते प्रवाशांना वेळोवेळी देत होते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्वतवही विलंब होऊ शकतो असे स्पाइसजेटने म्हटले आहे. या सर्व प्रकरणावर प्रवाशांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रवाशांना यावेळी कोणतेही रिफ्रेशनमेंटही देण्यात आले नव्हते. अखेर प्रवाशांनी अधिक गोंधळ घातल्यानंतर, स्पाइसजेटकडून त्यांना खायला देण्यात आले. सतत होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे प्रवाशांनी बोर्डिंग गेटवरच निषेध नोंदवला.
यातील अनेक प्रवाशांना अहमदाबादमध्ये त्यादिवशी महत्त्वाच्या कामासाठी जायचे होते. तसेच काहीजण परीक्षेकरता अहमदाबाद येथे जाणार होते. त्यामुळे सतत होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांचा राग अनावर झाला होता.