लेख : स्मिथ नावाचा मुगल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>द्वारकानाथ संझगिरी

ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी 251 धावांनी जिंकली! अशक्य! मी अजून डोळे चोळतोय. विश्वासच बसत नाही. कसा बसेल? एक महिनासुद्धा झाला नाही त्या गोष्टीला! एजबॅस्टनच्या प्रेसबॉक्समधून वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मी इंग्लंड ऑस्ट्रेलियाला बुकलून काढताना पाहत होतो. प्रेसबॉक्समधल्या काही इंग्लिश पत्रकारांच्या चेहऱयावर ‘विश्वचषक’ नावाच्या स्वर्गाच्या दारावर पोहोचल्याचा आनंद होता. काही त्या पलीकडे जाऊन मनाने ऍशेस विजयाकडे पोहोचले होते. तो ‘स्वर्ग’ त्यांना मिळाला. न्यूझीलंडने स्वर्गाचे सर्व दरवाजे बंद केल्यानंतर; ते एका विचित्र नियमाच्या चोरदरवाजातून, खरे तर चोरफटीतून आत शिरले. त्यानंतर काही दिवसांतच ‘आयर्लंड’ या कसोटीतल्या रांगत्या बालकाने त्यांना स्वर्गीय स्वप्नातून उठवले. आणि काल एजबॅस्टनवर ऑस्ट्रेलियाने त्यांना जमिनीवर आणले. एका महिन्याच्या आत. देव स्खलनशील माणसं झाली.

ऑस्ट्रेलिया हा संघ आहे की भुताटकीचे दुसरे नाव या संभ्रमात इंग्लिश संघ असेल. कुठे कसोटीच्या पहिल्या दिवशी 8 बाद 128 च्या कचाटय़ात सापडलेली ऑस्ट्रेलिया आणि कुठे ऑस्ट्रेलियाचा 251 धावांचा विजय! हे आपण एकाच कसोटीबद्दल बोलतोय हेच मनाला पटत नाही.

दोन खेळाडूंनी हे साध्य केले. एक स्टीव्ह स्मिथ, दुसरा नाथन लॉयन. एक फलंदाज 149 षटकं खेळतो. एकही संधी न देता प्रत्येक डावात एक मोठे शतक ठोकतो. (144 आणि 142) हे शक्य आहे? हो, स्टीव्ह स्मिथने ते शक्य करून दाखवले. बरं, तो अचानक निर्माण झालेला फलंदाज नाही. मधलं त्याच्या वनवासाचे एक वर्ष सोडले तर तो धावा काही वर्षे सातत्याने करत आला आहे. त्यासुद्धा साध्यासुध्या नाहीत. गेल्या 54 कसोटींत त्याने 25 शतके ठोकली आहेत. जवळपास एक आड एका कसोटीत शतक. चार वर्षांपूर्वी त्याच्या एजबॅस्टनला धावा होत्या 6 आणि 7. नंतर ट्रेण्टब्रिजला 5 आणि 6! स्लिप किंवा यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद होत होता तो! त्यानंतर पुढे त्याने इंग्लंडविरुद्ध 1100 धावा केल्या. सरासरी 158! एकशे अठ्ठावन्न ही प्रिंटिंग मिस्टेक नाही. त्यामुळे इंग्लंडसाठी ही त्याची ढगफुटी, सॉरी धावफुटी नवीन नव्हती. पण आश्चर्य एका गोष्टीचे वाटते, एका वर्षाच्या वनवासाचा त्याच्या फलंदाजीवर काहीच परिणाम झाला नाही? आयपीएलमध्ये त्याच्या फार धावा झाल्या नाहीत. विश्वचषकात तो सुरुवातीला अडखळला, पण कसोटी क्रिकेट आले आणि हा पुन्हा मुगल झाला. तेही थेट औरंगजेब. इंग्लंडकडून जिझिया कर वसूल करणारा!

त्याची आज कसोटी धावांची सरासरी 63 आहे. सर डॉन ब्रॅडमननंतर तोच थेट दुसऱया क्रमांकावर आहे. पण त्याची फलंदाजी पाहताना असे काही तो करू शकतो यावर विश्वास बसत नाही. काहीही झाले तरी फलंदाजीचे मोठेपण, धावांचे सातत्य हे शास्त्रशुद्ध तंत्रावर बरेचसे अवलंबून असते. या माणसाने काही वर्षांपूर्वी कोचिंग मॅन्युअल फेकून दिले. खेळताना तो केवढा अस्थिर वाटतो. कधी पॅडला हात लाव, कधी बॉक्सला हात लाव, कधी हेल्मेट नीट कर वगैरे प्रकार त्याचे सुरू असतात. नंतर खेळताना तो मात्र इतका शफल होतो (बॅक ऍण्ड ऍक्रॉस) की जवळपास ऑफस्टंपच्या पलीकडे जातो. पाहणाऱयाला तो कधीही पायचीत होईल असे वाटते. आपण तो पायचीत होण्याची वाट पाहीपर्यंत त्याच्या धावा धावफलकावर चढलेल्या असतात. तो ऑनला एकेरी धावा इतक्या सहजतेने आणि पत्ता लागू न देता वेचतो की, गोलंदाजाला आपला खिसा कधी कापला गेलाय हे कळतच नाही. बरं, पुल, स्क्वेअर कट, ड्राइव्हज् सर्व फटके तो मारतोच, पण हे करताना तो सौंदर्याची घडी सांभाळत बसत नाही. अंतिम परिणाम धावांचा गल्ला त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. आणि हे सर्व पाहताना आपल्याला जाणवते की फटके खेळायला त्याच्याकडे इतका वेळ असतो की, त्याच्यापुढे तीन-चार फटक्यांचा ऑप्शन्स आहे. त्यातला तो एक निवडतोय असे वाटते. काही वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध पर्थला खेळताना त्याने धावांची टाकसाळ टाकली. ती अव्याहत सुरू आहे. इंग्लंडपुढे प्रश्न आहे, ती रोखायची कशी? त्याशिवाय ऍशेसचा ते विचारही करू शकत नाहीत. एकेकाळी फलंदाजी करणारा लेगब्रेक गोलंदाज म्हणून त्याने कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यावर आता विश्वासच बसत नाही.

त्याच्या फलंदाजीतला विचित्रपणा हॉटेलरूमपासून सुरू होतो. तो कसोटी सामन्याच्या पाच दिवसांत फक्त 15-20 तास झोपतो. एरव्ही स्वतःचे काल्पनिक क्रिकेट खेळतो. बिछान्यावर आडवे पडून तो कुठल्या गोलंदाजाला कुठे खेळावे, कुठल्या चेंडूला काय करावे हा विचार करत बसतो. मध्येच आरशापुढे उभा राहून शॅडोबॅटिंग करतो. क्रिकेटच्या बुटात फुटबॉलचे मोजे घालतो आणि नाडय़ा टेपने मोजांना बांधतो. कुठल्याही गोष्टीमुळे चित्त विचलित होऊ नये म्हणून! जो रूटच्या संघाचे चित्त मात्र त्याने विचलित केलेय.

नाथन लॉयननेही इंग्लंडचे चित्त विचलित होण्याला हातभार लावलाय. त्याने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी टाकलीय. पण दुसऱया डावात बाऊन्स आणि टर्न मिळाल्यावर इंग्लिश फलंदाज धुक्यात बॅटिंग करतायत असे वाटले. 1956 साली जिम लेकर या इंग्लिश ऑफस्पिनरने ओल्ड ट्रफॉर्डवर ऑस्ट्रेलियाचे 19 बळी घेतले होते. हा जागतिक रेकॉर्ड कुणीही मोडलेला नाही. नाथनकडून इतिहासाची अल्पशी परतफेड सुरू आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये कसोटीत जे आपल्या अश्विनला जमले नाही ते मोईन अलीला जमले होते. एजबॅस्टनला जे मोईनला जमले नाही ते नाथन लॉयनला जमले. इंग्लंडसाठी दोन मोठे धोके आहेत. तिथे स्टिव्ह स्मिथच्या बॅटची रुंदी वाढेतय, इथे नाथनच्या फिरणाऱया चेंडूपुढे इंग्लिश फलंदाजांच्या बॅटची रुंदी कमी होतेय. हे जर असेच सुरू राहिले तर त्यामुळे इंग्लिश खेळाडू आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या चेहऱयावरच्या हास्याची रुंदीसुद्धा कमी होणार आहे. कारण ऍशेस त्यांच्यासाठी मौल्यवान आहे. ही एकमेव अशी राख आहे, जी इंग्लंडला सोन्यापेक्षा मौल्यवान वाटते.

[email protected]