खेळांचे 2020 – क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी; जागतिक स्तरावर स्पर्धांचा धडाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडाप्रेमींसाठी 2020 वर्ष आनंददायी असणार आहे. क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांच्या मानाच्या स्पर्धा या वर्षी खेळवण्यात येणार आहे. दोन टी-20 वर्ल्ड कप, टोकियो ऑलिम्पिक, युरो फुटबॉल कप, कोपा अमेरिका, महिलांचा 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप, आयपीएल या स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. चला मग सज्ज होऊया खेळांच्या 2020साठी…

दोन टी-20 वर्ल्ड कपचा धमाका

क्रिकेटप्रेमींना या वर्षी दोन टी-20 वर्ल्ड कपचा थरार अनुभवायला मिळणार आहे. महिलांचा टी-20 वर्ल्ड कप 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियात रंगणार असून यामध्ये 10 संघांमध्ये जेतेपदाची झुंज लागणार आहे. प्रत्येकी पाच संघांचे दोन गट तयार करण्यात आले असून हिंदुस्थानी महिला संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश या देशांचाही समावेश आहे. पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कपही ऑस्ट्रेलियातच रंगणार आहे. ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत 16 संघांमध्ये अजिंक्यपदासाठी चुरस लागणार आहे. या स्पर्धेत तब्बल 45 सामन्यांनंतर जेता मिळेल.

क्रिकेटचे वेळापत्रकही व्यस्त

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघालाही या वर्षी नॉनस्टॉप क्रिकेट खेळावयाचे आहे. हिंदुस्थानचा संघ मायदेशात श्रीलंका (टी-20), ऑस्ट्रेलिया (वन डे), दक्षिण आफ्रिका (वन डे) आणि इंग्लंड (टी-20, वन डे) यांच्याशी दोन हात करील. तसेच परदेशात टी-20 वर्ल्ड कप व ऑस्ट्रेलियाचा सामना करील. याचदरम्यान आयपीएल स्पर्धाही मायदेशात असेल. आशिया कप व श्रीलंका दौरा अद्याप निश्चित झालेला नाहीए. यासोबत 19 वर्षांखालील वर्ल्ड कपही यावर्षी होणार आहे.

 अर्जेंिटना, कोलंबियात कोपा अमेरिका स्पर्धा

दक्षिण अमेरिकेतील सर्वोत्तम देश कोपा अमेरिका या मानाच्या स्पर्धेत सर्वस्व पणाला लावणार आहेत. कोपा अमेरिका स्पर्धा अर्जेंंिटना व कोलंबिया येथे होणार आहे. 12 जून ते 12 जुलै या कालावधीत होणाऱया या स्पर्धेत 12 संघ आमने-सामने येणार आहेत. नऊ शहरांमध्ये या स्पर्धेच्या लढती होतील.

युरो झाले ‘साठी’चे

युरोप खंडातील देशांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी युरो फुटबॉल स्पर्धाही याच वर्षी खेळवण्यात येणार आहे. युरो स्पर्धा 12 जून ते 12 जुलै या कालावधीत होईल. युरोपियन चॅम्पियनशिपला 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यंदा 12 देशांमध्ये या स्पर्धेच्या लढती होणार आहेत. यंदा प्रथमच ही स्पर्धा एक किंवा दोन देशांमध्ये खेळवण्यात येणार नाही. तब्बल 12 देश या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियमवर अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.

हिंदुस्थानात महिलांच्या फुटबॉलची किक

हिंदुस्थानात याआधी 17 वर्षांखालील पुरुषांचा फुटबॉल वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. त्यामुळे ‘फिफा’कडून या वर्षी महिलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या (17 वर्षांखालील) आयोजनाचा मान हिंदुस्थानला मिळाला आहे. 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल. 16 संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील. हिंदुस्थानातील चार शहरांमध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिकची रंगत

दर चार वर्षांनंतर क्रीडाविश्वात ऑलिम्पिक या मानाच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी जपान येथील टोकियो येथे ऑलिम्पिक होणार आहे. यामध्ये 206 देशांतील जवळपास 11091 ऍथलिट पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. टोकियो ऑलिम्पिक 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या महोत्सवात 33 क्रीडा प्रकारांत 339 शर्यतींमध्ये खेळाडूंचा कस लागणार आहे.