टुकार राष्ट्रकुल स्पर्धेतून कायमचे बाहेर पडा ; नरिंदर बत्रा यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याऐवजी या दर्जाहीन स्पर्धेतून हिंदुस्थानने कायमचे बाहेर पडावे, असे परखड मत हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल स्पर्धेला विनाकारण महत्त्व देण्यापेक्षा इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नरिंदर बत्रा म्हणाले, आगामी ‘आयओए’च्या बैठकीत आपण हा प्रस्ताव मांडणार आहोत. सदस्यांनी बहुमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर ऑलिम्पिक समिती हा प्रस्ताव शासनाकडे घेऊन जाईल. राष्ट्रकुल ही दर्जाहीन स्पर्धा होय. हिंदुस्थानी खेळाडू या राष्ट्रकुल स्पर्धेत 70 ते 100 पदके जिंकतात, मात्र ऑलिम्पिकमध्ये आपल्या पदकांची गाडी दोनवरच अडते. राष्ट्रकुल स्पर्धेतून ना खेळाडूंना मानांकन मिळते, ना कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पात्रता. मग का उगाचच अशा स्पर्धेसाठी शक्ती वाया घालवायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

खेळाडूंचा मात्र विरोध

राष्ट्रकुल स्पर्धेतून कायमचे बाहेर पडावे या नरिंदर बत्रा यांच्या मताला हिंदुस्थानी खेळाडूंनी तीक्र विरोध केला. टेबल टेनिसपटू जी. साथियान, बॉक्सर विजेंदर सिंग, बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप, थाळीफेकपटू कृष्णा पुनिया, वेटलिफ्टर सतीश शिवालिंगम, माजी हॉकी कर्णधार जफर इक्बाल यांच्यासह अनेक क्रीडा संघटनांनीही नरिंदर बत्रा यांच्या मताला विरोध केला आहे. या स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी बलाढ्य देशांतील खेळाडू सहभागी होत असतात. राष्ट्रकुल स्पर्धा ही आशियाई स्पर्धेच्या तोडीची असते. शिवाय खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ होय अशा प्रतिक्रिया हिंदुस्थानच्या क्रीडा क्षेत्रातून आल्या आहेत.

  • बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी खेळाला वगळण्यात आल्याने हिंदुस्थानने जुलैमध्ये या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतलेला आहे. 14 नोव्हेंबरला राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा लुसी मार्टिन हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आयओए’ आणि क्रीडा मंत्रालय यांनी बैठक घेऊन या स्पर्धेवर केवळ बहिष्कार न टाकता कायमचे बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायला हवा, असे नरिंदर बत्रा यांचे म्हणणे आहे.