
सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे सर्वांना मनःस्ताप होतो. अशा दिशाभूल करणाऱया युजर्सला दणका देण्यासाठी ट्विटर नवे फीचर घेऊन येत आहे. कोविड- आरोग्य किंवा निवडणूक याविषयीचे ट्विट दिशाभूल करणारे वाटले तर युजर्स अशा ट्विटला ‘फ्लॅग’ करू शकणार आहेत.
नव्या सुविधेमुळे खोटी माहिती देणाऱयांना चाप बसणार आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियातील काही युजर्सला ही सुविधा देण्यात आल्याची माहिती ट्विटर कंपनीने मंगळवारी दिली.
यासंदर्भात ट्विटर कंपनीने स्पष्ट केलंय की, दिशाभूल करणारे ट्विट ‘रिपोर्ट’ करता यावे यासाठी आम्ही एका सुविधेवर काम करत आहोत. आम्ही प्रत्येक ‘रिपोर्ट’ची समीक्षा करणार नाही. सध्या फीचरची चाचणी सुरू असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही. तसेच प्रत्येक रिपोर्टला उत्तर देऊ शकत नाही. मात्र युजर्सच्या ‘इनपुट’ वरून आम्हाला ट्रेंड समजण्यास मदत होईल. त्यावरून या सुविधेचा वेग वाढवता येईल.



























































