वरळीतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर होणार

703

मुंबईतील, खासकरून वरळी विभागातील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. नगरविकास खात्यासह पर्यावरण विभागाकडे तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचा अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. एसआरए प्रकल्पातील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी येत्या दहा दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील एसआरए प्रकल्प व बीडीडी चाळींच्या संदर्भात नगरविकास विभागाकडे तांत्रिक अडचणींमुळे अडकलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज बैठक बोलावली होती. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एसआरए प्रकल्पातील अडचणी दूर

वरळीसह मुंबईतील एसआरए प्रकल्पांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. नगरविकास व पर्यावरण विभागाकडील काही तांत्रिक बाबींमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडचणींची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. एसआरए प्रकल्पातील अडचणींचा अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना दिले. प्रकल्पांबाबत अहवाल सादर झाल्यावर पुढील दहा दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. एसआरए व वरळीच्या बीडीडी चाळींच्या संदर्भात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची बैठकही होणार आहे.

माहुलच्या प्रकल्पग्रस्तांना घरे

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांना म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात काही घरे देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

मिठी नदीच्या पुनुरुज्जीवनाचे काम गतिमान करावे

मिठी नदीच्या पुनुरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज घेतला. या नदीचे प्रदूषण निर्मूलन, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱयांना दिल्या. मिठी नदीच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. बैठकीला मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, अतिक्रमण निष्कासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील नद्यांच्या पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण विभाग आता पुढाकार घेणार आहे. मिठी नदीच्या पुनुरुज्जीवनाचा प्रकल्प गतिमान करावा. त्याबरोबरच मुंबईतील दहिसर, पोईसर, ओशिवरा या नद्यांचे कामही गतिमान करावे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या