पहिली कसोटी 63 धावांनी जिंकून सनसनाटी निर्माण करणाऱया श्रीलंकेने दुसऱया कसोटीतही आपल्याच खेळाचा ढोल बडवला. पहिल्या डावात तीन शतकी खेळींच्या जोरावर 5 बाद 602 असा धावांचा डोंगर उभारल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 88 धावांत गुंडाळून श्रीलंकेने आपला विजय निश्चित केला होता. आज कसोटीच्या चौथ्याच दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 360 धावांत संपवून आपला डाव आणि 154 धावांच्या महाविजयावर शिक्कामोर्तब केले. एवढेच नव्हे तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्भेळ यश मिळवत तब्बल 16 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
प्रभात जयसूर्याच्या फिरकीने श्रीलंकेला हा अनपेक्षित विजय मिळवून दिला. त्याने न्यूझीलंडचा 88 धावांत खुर्दा करताना 42 धावांत 6 विकेट घेतल्या, तर दुसऱया डावात न्यूझीलंडचा संघर्ष मोडून काढताना 139 धावांत 3 विकेट मिळवल्या. लंकेने फॉलोऑन लादल्यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी झुंजार खेळ केला. टॉम ब्लंडल (60), ग्लेन फिलीप्स (78), मिचेल सॅण्टनर (67) यांनी जोरदार खेळ करीत संघाचा डावाचा पराभव टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, पण लंकन गोलंदाजांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. फिरकीवीर निशान पेरीसने पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱया डावात 170 धावा देत त्याने 6 विकेट मिळवत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयाचा शिल्पकार नाबाद 182 धावांची खेळी करणारा कामिंदु मेंडिस ठरला तर मालिकेत 18 विकेट टिपणारा प्रभात जयसूर्याने ‘मालिकावीरा’चा मान मिळवला.
श्रीलंकेच्या आशा पल्लवित
सलग तीन कसोटी विजयांसह श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या आपल्या आशा पल्लवित केल्या आहेत. येत्या जून महिन्यात कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत लॉर्ड्सवर खेळविली जाणार असून यासाठी सध्या हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया दिग्गजांमध्ये संघर्ष सुरू असला तरी श्रीलंकेनेही यात उडी मारली आहे. नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यातही त्यांनी याच विजयाची मालिका कायम ठेवली तर ते अंतिम फेरीसाठीही पात्र ठरतील.