
सामना प्रतिनिधी । मुंबई
मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर आता परीक्षा फीचे एचडीएफसी बॅंकेचे चलनही ऑनलाइन तयार होणार आहे. हे चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जमा करायचे आहेत.
मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीपोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. ऑनलाइन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम दिलेल्या मुदतीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांच्या बँकेच्या खात्यामधून NEFT/RTGS द्वारे चलनावरील नमूद 21 अंकी बँक अकाऊंट व आयएफएससी कोडप्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे. चलनावरील आयएफएससी कोड हा HDFC0000007 असा आहे.



























































