दिवाळीच्या सुट्टीत दहावीचे परीक्षा अर्ज भरणार कसे? वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

662

मार्च 2020 मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नियमित शुल्कासह 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीतच परीक्षा अर्ज भरण्याची मुदत असल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला असून सुट्टीच्या काळात परीक्षा अर्ज कसे भरणार, असा सवाल उपस्थित केला आहे.

5 नोव्हेंबरनंतर परीक्षा अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारले जाणार आहे. बहुसंख्य शाळांची दिवाळी सुट्टी ही 6 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विलंब शुल्क भरून भरायचे का? असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी शाळेमार्फतच परीक्षा अर्ज भरायचे असल्याने दिवाळीची सुट्टी संपल्यावर दहावीचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळाचे प्रशांत रेडीज यांनी केली आहे.

 www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ

दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची फी माफ करण्यात येणार असून या विद्यार्थ्यांचे गाव, तालुका, जिल्हा आणि विद्यार्थी, पालकांच्या बँक खात्याची माहिती सादर करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या