
दहावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असताना कल्याणमधील 18 मुलांना हॉल तिकिटसाठी वेठीस धरल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. मार्चपर्यंत शाळेची फी भरली असतानाही एप्रिल, मे महिन्याची फी आगाऊ भरली तरच परीक्षेचे हॉल तिकीट मिळेल, असे म्हणूत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार सेंट जुड्स स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला. शाळा प्रशासनाच्या मुजोरीविरोधात अखेर पालकांनी उपोषण सुरू केल्यानंतर शाळा प्रशासन नरमले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हॉल तिकीट हातात पडल्यानंतर मुलांचा जीव भांडय़ात पडला.
कल्याण पूर्व येथे सेंट जुड्स स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. दहावीच्या मुलांना प्रत्येक महिन्याला बाराशे रुपये फी आहे. मार्चपर्यंत सर्व मुलांनी फी भरली आहे. असे असतानाही मुलांना एप्रिल आणि मे महिन्याची फी भरण्यासाठी तगादा लावला जात होता. फी भरा मगच दहावी परीक्षेचे हॉल तिकीट मिळेल, असे म्हणत आठ दिवस मुलांना माघारी पाठवले जात होते. पालकांनी शाळेत आतापर्यंत फी भरली आहे.
याबाबतची माहिती शैलेश तिवारी, राहुल काटकर, आनंता गायकवाड, योगेश गव्हाणे, जितेंद्र वाकचौरे, दुर्गेश मिश्रा यांनी शाळेवर धडक देत शाळेच्या दारात उपोषण सुरू केले. कोळसेवाडी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जोपर्यंत परीक्षार्थिंना हॉल तिकीट मिळणार नाही तोवर शाळा उघडू देणार नाही, असा पवित्रा शैलेश तिवारी यांनी घेतल्यानंतर शाळा प्रशासन ताळ्यावर आले.
मुलीला मानसिक धक्का
आम्ही नियमित फी भरली असतानाही गेले आठ दिवस आम्हाला हेलपाटे मारायला लावले. आगाऊ दोन महिन्यांची फी भरा मगच हॉल तिकीट मिळेल, तोपर्यंत शाळेत पाय ठेवू नका असे म्हणून आम्हाला अपमानित केले. या मानसिक धक्क्याने माझी मुलगी अनुष्काची प्रकृती बिघडली. शाळेला विद्यार्थी हितापेक्षा पैसे उकळायचे आहेत.
– रोशन जाधव, पालक.





























































