
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षांना बसलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कला कोटय़ातील वाढीव गुणांना यंदा कात्री लागण्याची भीती वर्तविली जात आहे. या परीक्षांचा निकाल कला संचालनालयाने अद्याप जाहीर केलेला नाही. त्यातच एसएससी बोर्डाने कोटय़ातील वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. याआधी निकाल जाहीर न झाल्यास किंवा प्रस्ताव सादर करण्याची मुदत न वाढवल्यास विद्यार्थ्यांना हक्काच्या गुणांपासून वंचित राहावे लागणार आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची परीक्षा होते, पण यंदा विधानसभा निवडणुकीमुळे या परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या. परीक्षेलाच उशीर झाल्याने सहाजिकच निकालालासुद्धा उशीर होत असून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो कला संचालनालयाकडून पोस्टाने परीक्षा केंद्रावर येईल. तेथून शाळांना निकालाचे वाटप होईल. त्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने 15 जानेवारीपर्यंत शाळा विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव कसे सादर करणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापक संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कला कोटय़ातील प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव प्रशांत रेडीज, दिलशाद थोबानी, तुकाराम सवादेकर, जयसिंग कदम यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक संघटनेने 30 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली.






























































