दहावी, बारावीच्या रिपीटर्सना संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षा, 25 टक्के कपात लागू नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मात्र कमी अभ्यासक्रमाची परीक्षा केवळ नियमित विद्यार्थ्यांसाठीच असून रिपीटर्स विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षा द्यावी लागणार आहे. मार्च 2020 मध्येही दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या यंदाच्या रिपीटर्स विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात लागू नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात झाली. शाळा बंद असल्याने चार ते पाच महिने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणच घेतले. त्यामुळे दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात यावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार पहिली ते बारावीचा सरसकट 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला तसेच दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणाऱया बोर्डाच्या परीक्षाही यंदा पुढे ढकलून एप्रिल, मेमध्ये घेण्यात येत आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दहावी, बारावीच्या रिपीटर्स विद्यार्थ्यांसंबंधी परिपञक जारी केले असून रिपीटर्स आणि श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे.

अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात यांच्यासाठी

दहावी, बारावीचे नियमित विद्यार्थी, तुरळक विषय घेतलेले, प्रथमच खासगी विद्यार्थी म्हणून परीक्षा देणारे, आयटीआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसाठी काही विषयांची परीक्षा देणारे विद्यार्थी.