एसटीच्या विलीनीकरणाची सुनावणी 22 फेब्रुवारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे अतोनात प्रयत्न सुरू असून सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने संप सोडवण्यासाठी काही शिफारशी केल्या असून त्याबाबतचा अहवाल बंद लिफाफ्यात मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला आहे. या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही खंडपीठासमोर ठेवण्यात आला असून विलीनीकरणाच्या याचिकेवर न्यायालयात 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

 विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱयांनी 27 ऑक्टोबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे. संघटनेने अद्यापही संप मागे घेतला नसल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. याविरोधात एसटी महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयात संघटनेविरोधात याचिका दाखल केली आहे. तर विलीनीकरणाच्या मागणीसाठी संघटनेने याचिका दाखल केली आहे.
 या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने राज्याचे मुख्य सचिव, परिवहन व वित्त विभागाचे प्रधान सचिव अशी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने एस. सी. नायडू यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, महामंडळाचे अधिकारी आणि 28 युनियनच्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या आहेत तसेच समितीचा अंतिम अहवाल तयार आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यावर अभिप्राय दिला आहे.

आंदोलन चिघळणार

विलीनीकरणासंदर्भात बाजूने निकाल आला नाही तर एसटी कर्मचारी आक्रमक होऊन आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलक रेल्वेने तसेच रस्ते मार्गाने मुंबईत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना टोलनाक्यावर अडवून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. हे आंदोलक आझाद मैदानासह मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सह्याद्री अतिथीगृह, परिवहनमंत्र्यांचे निवासस्थान, उच्च न्यायालय या ठिकाणी जमण्याची शक्यता असल्याने पोलिसांना बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.