पहिल्याच दिवशी एसटीचे प्रवासी 31 हजारांनी वाढले

एसटीची वाहतूक पूर्ण शंभर टक्के प्रवासी क्षमतेने करण्याच्या निर्णयाने राज्यात पहिल्याच दिवशी काल एसटीची प्रवासी संख्या 31 हजार 446 ने वाढली आहे. राज्यात काल 4,565 बसेसद्वारे सुमारे 16 हजार फेऱया चालविण्यात येऊन 5 लाख 22 हजार 184 प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर 20 ऑगस्टपासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळीत एसटीने 50 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू केली होती. परंतू त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे तोटय़ात गेलेल्या महामंडळाला आणखीन फटका बसत होता. डिझेलचा वाढता खर्च आणि प्रवासी कमी त्यामुळे रोजचा खर्चही निघेना झाल्याने एसटी महामंडळ आणखीन तोटय़ात सापडले. त्यामुळे 18 सप्टेंबरपासून शंभर टक्के क्षमतेने बसेस चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. आदल्या दिवशी पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने 17 सप्टेंबर रोजी राज्यात महामंडळाने 4410 बसेसद्वारे चालविलेल्या 16,347 फेऱयांना 4 लाख 90 हजार 738 प्रवासी होते. तर काल 18 सप्टेंबर रोजी शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 184 प्रवासी लाभले. म्हणजे पहिल्याच दिवशी एसटीला 31 हजार 446 प्रवासी अधिक लाभल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाची जसजशी माहिती मिळेल तसतशी एसटीची प्रवासी संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तकिण्यात येत आहे

आपली प्रतिक्रिया द्या