
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्ह्यात पाच दिवसापासून महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धनमध्ये पावसाने थैमान घातले आहे. दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. रस्त्यावरून वा पुलावरून वाहत्या पाण्यातून वाहन चालवू नये अशा सूचना असतानाही एसटी महामंडळाच्या चालकाने स्वतःचा व 25 प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून बस पाण्यात नेण्याचा प्रकार 6 ऑगस्ट रोजी केला होता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना नागरिकांच्या मदतीमुळे टळली. त्यामुळे 25 जणांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे बोलण्याची वेळ आली आहे.
6 ऑगस्ट 2019 ची रात्र रायगडमधील दक्षिण तालुक्यातील नागरिकांसाठी काळरात्र ठरली होती. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाच्या कोसळधारा सुरू होत्या. महाड माणगाव गोरेगाव विभागाला मुसळधार पावसाने महापुराचा तडाखा बसला होता. स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस, प्रशासकीय यंत्रणा डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देत होती. महाडमध्ये एनडीआरएफ, कोस्टल गार्ड, सैन्यदलाच्या तुकड्या मदत करत होत्या. या भयंकर परिस्थिती मधून माणगाव तालुक्यातील गोरेगाव देखील सुटले नव्हते. गोरेगाव म्हसळा रस्त्यावरती गावतलावाजवळ प्रचंड पाणी आल्याने संध्याकाळ पासूनच हा मार्ग वाहतूकी साठी बंद ठेवला होता. त्यामुळे गोरेगावातील जागृत नागरिक सतर्क होते.
जिल्ह्यात पावसाने व नद्यांनी रुद्रारुप धारण केले होते. मुंबईकडून श्रीवर्धनकडे येणारी रात्रीची बस 25 प्रवाशांना घेऊन अडीच वाजता गोरेगाव बसस्थानकात दाखल झाली. मोर्बे मार्गे ही बस श्रीवर्धनकडे नेहमी जात असते मात्र पावसामुळे व रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे चालकाने गोरेगाव मार्गे श्रीवर्धन जाण्याचा बेत आखला. मात्र गोरेगावमध्येही पाणी साचले असल्याने गोरेगावातील सतर्क नागरिकांनी उर्दू शाळेजवळ बस थांबवून रस्त्यावर पाणी आहे पुढे जावू नका असा सल्ला चालकाला दिला.
मात्र बसच्या चालकाने नागरिकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून बस पाच ते सहा फूट वाहत्या पाण्यात घातली. काही अंतरावर गेल्यावर बस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून कलंडत होती. मात्र सुदैवाने बाजूला असलेल्या नाल्याला बस अडकली. त्याचवेळी सल्ला देणाऱ्या जांबाज नागरिकांनी जीवाची पर्वा न करता कंबर भर पाण्यातून जाऊन बसमधील 25 प्रवासी, चालक, वाहक यांना सुरक्षित बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ होऊन चालक, वाहकासह पंचवीस जणांना जलसमाधी मिळाली असती.
चालकाने मुर्खपणामुळे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करून वाहत्या पाण्यातून बस काढण्याचा केलेला प्रयत्न स्वतः, वाहक व प्रवाशाच्या जलसमाधीचे कारण ठरले असते. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणताही अनर्थ घडला नाही.


























































