एसटी चालकाचा स्त्री शक्तीला सलाम, आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने बसवर सजली ‘नथ’

590

आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे एसटी चालक संतोष पाटील यांनी या वर्षी एसटी सजावटीतून ‘नारी’शक्तीला सलाम केला आहे. महिला सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविलेल्या महिलांचे प्रेरणादायी ‘पोस्टर्स’ एस्टीवर चिकटवून अनोख्या पद्धतीने रणरागिणींच्या कार्याला सलाम केला आहे.

मालवण एसटी आगारात संतोष पाटील हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहेत. एसटी आपला संसार असून प्रवासी आपले कुटुंबातील सदस्य आहेत, या भावनेतून त्यांनी हजारो प्रवाशांच्या हृदयावर राज्य गाजवले. शैक्षणिक सहल, प्रासंगिक करार तसेच एसटीच्या ज्यादा फेऱ्या असल्या की प्रवाशांना पाटील यांच्या ताफ्यातील एसटीने प्रवास करणे अधिक सुखकर वाटते. एसटी म्हटली की लाल डबा म्हणून नाक मुरडणारे सर्वसाधारण प्रवासी चालक पाटील यांना पहिल्यावर मात्र त्यांच्या ‘लालपरी’त बसण्यासाठी आतुर होतात.

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी बसमध्ये खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था करणाऱ्या एसटी चालक पाटील यांनी यावर्षी रणरागिणीचे कार्य अधोरेखित करणारी एसटी बसची सजावट केली. पाटील यांना त्यांच्या पत्नीकडून मोलाचे सहकार्य लाभले. चालक पाटील यांनी आगारातील सर्व अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे सांगितले.

‘नथ’ सजावट
आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त सजविण्यात आलेल्या एसटी बसच्या दर्शनी भागाला हिंदुस्थानी नारीची ओळख असलेली प्रतिकात्मक ‘नथ’ लावण्यात आली होती. तर एसटीच्या बाहेरील तीन बाजूना पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अंतराळवीर कल्पना चावला, महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, पहिली महिला डॉक्टर डॉ. आंनदीबाई जोशी, पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सकपाळ, क्रीडा क्षेत्रातील मेरी कोम, मदर तेरेसा, पी. टी. उषा आदी प्रेरणादायी महिलांचे छायाचित्रे लावली होती. चालक पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एसटीच्या माध्यमातून उचललेल्या प्रबोधनाच्या कार्याचे भाविक प्रवाशांमधून कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या