
एसटीच्या कर्मचाऱ्य़ांना माहे जुलै देय ऑगस्ट ते माहे सप्टेंबर देय ऑक्टोबर पर्यंतचे अशा तीन महिन्यांचे वेतन पुरेशा निधीअभावी मिळालेले नाही. राज्य सरकारकडून 150 कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातच मजुरांची त्यांच्या राज्याच्या सीमेवर पाठवणूक केल्याचे 90 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे अखेर माहे जुलै देय ऑगस्ट महिन्याचे थकीत वेतन कर्मचाऱ्य़ांच्या बँक खात्यावर जमा करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे.
कोरोना संकटकाळात एसटीचे हुकमी उत्पन्न असलेला सुट्ट्यांचा हंगाम वाया गेला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही पन्नास टक्के क्षमतेने गाड्या चालविण्यात आल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक झाल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले. आता एसटीचे उर्वरित दोन महिन्यांचे वेतन मिळण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्य़ा निधीवरच विसंबून रहावे लागणार आहे. एसटीने प्रवासी वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरू केली असून मालकाहतुकीद्वारेही उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.




























































