एसटीच्या जाहिरातींच्या 140 जागांवर सरकारचा डल्ला

एसटीच्या स्थानक व आगारांच्या आवारातील जाहिरातीच्या 140 जागांवर सरकारने डल्ला मारला आहे. एसटीच्या जागांवर सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा परस्पर काढली. या माध्यमातून सरकारने महामंडळाच्या जाहिरातीच्या 140 जागा हडपल्या आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.

एसटीच्या स्थानक परिसर व आवारातील जाहिरातीमधून महामंडळाला काही कोटींचे उत्पन्न मिळते. या जागांवर सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीची निविदा काढली आहे. प्रक्रियेची निविदापूर्व बैठक सोमवारी माहिती व तंत्रज्ञान संचानालयाने आयोजित केली होती. त्याला एसटी महामंडळाने आक्षेप घेतल्याचे समजते. यापूर्वी पाच वर्षाच्या करारावर जाहिरातीच्या जागा भाडेतत्वावर घेणाऱया कंपनीने आक्षेप घेतला आहे.

सरकारचे अतिक्रमण खपवून घेणार नाही

कोटय़वधींचे उत्पन्न देणाऱया एसटीच्या जाहिरातींच्या जागांवरील सरकारचे अतिक्रमण सहन करणार नाही. संबंधित जागा मर्जीतील खासगी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.