
सामना प्रतिनिधी । मुंबई
डिझेल दरात सातत्याने होणारी दरवाढ. त्यातच एसटी महामंडळाने अलीकडेच केलेला वेतनकरार यामुळे एसटी महामंडळाने सर्क प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात १५ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासूनच १८ टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली ४८४९ कोटी रुपये वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तक ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. याचबरोबर यापुढे तिकिटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रकासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीट दर आकारला जाईल. या निर्णयामुळे सुटय़ा पैशांचा प्रश्न सुटणार असून ही कादाकादी थांबेल असे एसटी महामंडळाने कळविले आहे.




























































