
विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शे-दीडशे एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजीसह दुपारी जोरदार निदर्शने केली. अचानक हा जमाव घुसल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. दरम्यान, मोठय़ा धैर्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सामोरे जात आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिसांनी याप्रकरणी 24 महिलांसह 103 आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणाबद्दल राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत असून सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत आहे.
एसटी संपाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आझाद मैदानात जल्लोष केला, गुलाल उधळत आनंद साजरा केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हा संप मिटला असेच वातावरण सर्वत्र होते. त्यामुळे आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचारी शुक्रवारी परतीच्या वाटेवर निघाले असताना शेकडो कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट स्कूलबसने ‘सिल्व्हर ओक’ येथे पोहोचला आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
एकामागून एक धावत आलेल्या आंदोलकांनी सिल्व्हर ओक निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या दिला. गेटवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांना पुढे करून काही पुरुष आंदोलक सिल्हवर ओकच्या आवारात घुसले. मोजकाच पोलीस बंदोबस्त आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ देखील उडाला आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी आंदोलक कर्मचारी घुसल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील सिल्व्हर ओकवर धाव घेत शरद पवारांच्या समर्थानार्थ घोषणबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.
आंदोलक महिलांचा संताप
सुप्रिया सुळे आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच एका महिलेने, तुम्ही माझा गेलेला नवरा आणि मुलगा परत आणून द्याल का? तुम्ही सर्वसामान्यांची एसटी हडप करण्याच्या प्रयत्नात होतात. आम्ही या सरकारचा धिक्कार करतो, असा संताप व्यक्त केला
12 तारीख, 12 वाजता, स्थळ बारामती! आंदोलकांचा पुन्हा इशारा
पोलिसांनी एसटी कर्मचाऱयांना ताब्यात घेऊन शाळेच्या व्हॅनमध्ये बसवले. मात्र, तिथेही कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. आजपर्यंत 120 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतोय. शरद पवारांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केले. यापेक्षाही तीव्र आंदोलन लवकरच करू. 12 तारखेला, 12 वाजता, स्थळ बारामती असेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
घरावरील आंदोलनाचे समर्थन नाही
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वार्थाने चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजिबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त करतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरे, दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली भेट
हल्ल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही तिथे पोहोचली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण इतके घाणेरडे कधीच नव्हते. यापूर्वी कुणाच्याच घरावर अशाप्रकारचे आंदोलन झाले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल
सुप्रिया सुळे धैर्याने आंदोलकांना सामोऱया गेल्या
सुप्रिया सुळे यांनी मोठय़ा धैर्याने आंदोलकांना सामोरे जात चर्चेचे आवाहन केले. मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. शांततेच्या मार्गाने चर्चा करा, मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. आमच्यावर दगडफेक करून किंवा चपला फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आंदोलकांनी शांततेने चर्चा करावी, मी या क्षणी तुमच्याशी बोलायला तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे. प्रथम त्यांच्या सुरक्षिततेची मला खात्री करू द्या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मात्र, आंदोलक आक्रमक मनस्थितीत असल्याने ऐकायला तयार नव्हते.
गुप्तचर खात्याला समजले कसे नाही?
शंभर जणांचा जमाव दुपारी आझाद मैदानातून बाहेर पडतो आणि थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसतो याची पोलीस आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला खबरबात नव्हती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आंदोलक पोहोचल्यानंतर पोलीस पोहोचले आणि जमावाला पांगवले. दरम्यान, हे पोलिसांचे अपयश असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सदावर्ते यांनी कट रचल्याचा आरोप
हल्ल्याचा कट अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी रचल्याचा आरोप पोलिसांनी केला असून भादंवि कलम 141 ते 149, 353, 332, 452, 120 (ब), 107 आणि 448 अन्वये सदावर्ते यांना आज रात्री अटक करण्यात आली.




























































