
सामना प्रतिनिधी । नगर
नगरला सलग दुसऱ्या दिवशी एसटी कामगार संघटनांचा बंद सुरू असून जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अकरा आगारापैकी पाच आगार बंद तर सहा आगारात जेमतेम वाहतूक सुरू आहे.
पारनेर, संगमनेर,श्रीगोंदा, नेवासा आणि शेवगाव तालुक्यात एसटी ठप्प आहे तर तारकपूर, जामखेड, कोपरगाव,अकोले, संगमनेर, श्रीरामपूर या सहा आगारात जेमतेम वाहतूक सुरू असल्याचं सांगण्यात आलं. एसटी कामगारांच्या संपानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी शेवगाव तालुक्यात एसटी बंदमध्ये सहभाग घेणार्या कर्मचार्यांना एसटी प्रशासनाने दणका देत सोळा चालक वाहकांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, बस अडवणे, दैनंदिन नुकसानास जबाबदार या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून इतर ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.




























































