एसटी कामगारांचे आजपासून धरणे आंदोलन, थकबाकीचा प्रश्न सुटल्याशिवाय माघार नाही, कृती समितीचा इशारा 

विविध भत्त्यांच्या 4 हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकीच्या प्रश्नावर राज्यातील एसटी कामगार सोमवारपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. एसटी कामगारांच्या तब्बल 18 संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारने प्रलंबित आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे.

एसटी महामंडळातील कामगारांच्या आर्थिक मागण्यांबाबत महायुती सरकारकडून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी कामगारांमध्ये महायुती सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिवहन मंत्र्यांनी थातूरमातूर आश्वासन दिले, मात्र त्याअनुषंगाने ठोस कार्यवाही सुरू झाली नाही. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त कृती समितीमधील सर्व कामगार संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी एसटी कामगार संघटनेचे हणमंत ताटे, संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, राजेंद्र मोजाड, श्रीरंग बरगे, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई सेंट्रल परिसरात परवानगी नाकारली!

एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी परिवहन महामंडळाला आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यानुसार महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल आगार परिसरात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र तेथे आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे.

तर राज्यभरात तीव्र आंदोलन करणार

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या इशाऱयाने सरकार हादरले असून सोमवारी मंत्रालयात पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत दिवाळीपासून एसटी कामगारांना थकबाकीची रक्कम देण्याबाबत निर्णय घेतला गेला नाही तर मंगळवारपासून राज्यभरात बेमुदत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संयुक्त कृती समितीने दिला आहे. दिवाळीत एसटीची सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून सरकारने वेळीच तोडगा काढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी दिली.