
सामना प्रतिनिधी । पुणे
बुधवार पेठेत दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या विजय शिवाजी मंडळाचा स्टेज कोसळला. यामध्ये बक्षीस स्वीकारण्यासाठी गेलेली एक मुलगी व दोन कार्यकर्ते जखमी झाले. रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ शनिमंदिर येथे विजय शिवाजी मंडळाकडून दहीहंडी साजरी केली जात होती. त्यासाठी सुमारे १५ फूट उंच स्टेज उभा केला होता. त्यावर डीजे सिस्टिम लावली होती. रात्री दहाच्या सुमारास गोविदांनी एका लहान मुलीला वर चढवून दहीहंडी फोडली. त्याचे बक्षीस घेण्यासाठी ही मुलगी स्टेजवर गेली. मागून काही गोविंदा वर चढत होते. तेवढ्यात स्टेज कोसळल्याने गोंधळ उडाला.
या घटनेत ही मुलगी जखमी झाली असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच, दोन कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. या घटनेची माहीती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने हा स्टेज बाजूला घेण्याचे काम रात्री सुरू होते.






























































