
मुंबईत सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या भीतीमुळे अनेक स्टॉल बंद आहेत. पण तरीही पालिकेने भाडे वसुली सुरू केल्यामुळे स्टॉलधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंतचे भाडे महापालिकेने माफ करावे अशी विनंती मुंबई अधिकृत स्टॉलधारक संघाच्यावतीने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
मुंबईच्या वेगवेगळ्या भागात किमान सात ते आठ हजार स्टॉल आहेत. या स्टॉलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हजारो कुटुंब अवलंबून आहेत. मागील दोन-तीन महिन्यामध्ये लॉकडाऊनमुळे सर्व स्टॉल बंद होते. त्यामुळे स्टॉलधारकासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पण महापालिकेने भाडे भरण्यासाठी आता तगादा लावला आहे. पालिकेच्या धोरणानुसार तीन महिन्यांचे भाडे भरले नाही तर दंड आकारला जात आहे. स्टॉलचा परवाना रद्द होईल म्हणून अनेक स्टॉलधारक दंड भरत आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत भाडे व दंड भरणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व स्टॉलधारकांचे चार महिन्यांचे भाडे माफ करण्याची विनंती स्टॉलधारक संघाचे अध्यक्ष बाबाजी शिंदे यांनी महापौरांना पत्राद्वारे केली आहे.



























































