
मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात येणारे होर्डिंग्ज हे नेहमीच चर्चेचे विषय असतात. पण दादर प्लाझा सिनेमागृहाजवळील एका अनोख्या डान्सिंग होर्डिंगने सध्या मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरू होणाऱया ‘मी होणार सुपरस्टार’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी हे होर्डिंग्ज बसविण्यात आले असून अभिनेता आणि या मालिकेचा सुपर जज अंकुश चौधरी याच्या हस्ते या डान्सिंग होर्डिंग्जचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
स्टार प्रवाहावर येत्या 21 ऑगस्टपासून ‘मी होणार सुपरस्टार’ ही मालिका सुरू होत आहे. त्या निमित्ताने या डान्सिंग होर्डिंग्जचे दिमाखात अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमातील लायन्स ग्रुप आणि मायनस थ्री हे दोन ग्रुप्सदेखिल उपस्थित होते.
या मालिकेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातले स्पर्धक, नृत्यदिग्दर्शनाची उत्तम जाण असलेले कृती महेश आणि वैभव घुगेसारखे कॅप्टन्स, संस्कृती बालगुडेचे खुमासदार सूत्रसंचालन आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अर्थातच अंकुश चौधरीचे मोलाचे मार्गदर्शन यामुळे या कार्यक्रमाची रंगत द्विगुणित होणार आहे. या अनोख्या उपक्रमाचे अंकुश चौधरी याने कौतुक केले. या स्पर्धकांचे सुपरस्टार होण्याचे स्वप्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.


























































