
हिंदुस्थान दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी आज मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला संबोधित केले. या वेळी त्यांनी भाषणाची सुरुवात हिंदीत करत उपस्थितांची मने जिंकली. नमस्कार मुंबई, इथे आल्याचा मला खूप आनंद झाला, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. या पार्श्वभूमीवर स्टार्मर हिंदुस्थानात आले आहेत. ‘ग्लोबल फिनेटक फेस्ट’मध्ये सहभागी होण्याआधी पंतप्रधान स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी फेस्टला संबोधित केले. वित्तीय तंत्रज्ञानाच्या (फिनटेक) बाबतीत हिंदुस्थान आणि इंग्लंड हे नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्यातील मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांचा मोठा विजय आहे.
‘फिनटेक’मधील गुंतवणुकीसाठी ब्रिटन पहिल्या पसंतीचा देश असावा अशी माझी इच्छा आहे. मुक्त व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या संधीचा उद्योगांना लाभ घेता यावा यासाठी सरकारांनी काय करावे, या सूचना दोन्ही देशांतील उद्योजकांनी कराव्यात, असे आवाहन स्टार्मर यांनी केले.
9 ब्रिटिश विद्यापीठे हिंदुस्थानात येणार
नरेंद्र मोदी व स्टार्मर यांच्यात राजभवन येथे द्विपक्षीय चर्चाही झाली. व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांतील सहकार्य कसे वाढवता येईल हा चर्चेचा पेंद्रबिंदू होता. व्यापार वृद्धीसाठी आणि तरुणांना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ पोस्ट करून ही माहिती दिली. ब्रिटनमधील 9 विद्यापीठे हिंदुस्थानात आपल्या शाखा सुरू करतील, असे मोदींनी सांगितले.