राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची कुलगुरूंची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था, पदवी महाविद्यालये व विद्यापीठे त्वरित सुरू करण्याची मागणी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. महाविद्यालये सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र राज्य सरकारच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नसल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत सांगितले.

राज्यातील विद्यापीठांमधील अनेक संविधानिक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही या वेळी कुलगुरूंनी केली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व 20 विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. विद्यापीठांचे 2020-21 या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधानिक पदांचा आढावा घेणे, सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले होते.

विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरू केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्गदेखील होत आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशा वेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येईल का? किंवा पाळीमध्ये चालवता येईल का? याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील महाविद्यालये कशी सुरू करावीत याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरू करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपापले लेखापरीक्षण नियमितपणे करून घ्यावे, अशीही सूचना राज्यपालांनी विद्यापीठांना केली.

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय लवकरच!

महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसाठी एसओपीदेखील तयार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.