
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवलेल्या गेलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 4 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.03 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 106 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 22 लाख 12 हजार 384 चाचण्या झाल्या असून 19 लाख 2 हजार 458 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 4 लाख 94 हजार 815 जण होम क्वारंटाइन असून 3 हजार 660 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
मुंबईत दिवसभरात 503 कोरोना रुग्ण
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 503 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 594 जण कोरोनामुक्त झाले.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 19 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 359 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 650 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 22 लाख 25 हजार 190 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 87 हजार 816 वर पोहोचली आहे.


























































