राज्यातील 12 मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

274

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने खालील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

नाटक विभागासाठी श्री सतीश पुळेकर, कंठ संगीतासाठी श्रीमती कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीतासाठी श्रीमती मंगलाताई जोशी, मराठी चित्रपटासाठी श्री मनोहर आचरेकर, कीर्तनासाठी श्रीमती तारा राजाराम देशपांडे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे, नृत्यासाठी श्रीमती रत्नम जनार्धनम्, आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईके, वाद्यसंगीतासाठी श्री अप्पा वढावकर, तमाशासाठी श्री. हसन शहाबुद्दीन शेख, लोक कलेसाठी श्रीमती लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी श्री सदाशिव देवराम कांबळे यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.१ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट (मराठी), कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगीत,तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या जेष्ठ कलाकाराला सन 1976 पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कार घोषित झालेल्या सर्व मान्यवरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या