‘स्थानिक’च्या निवडणुकांसाठी रविवारीही अर्ज स्वीकारणार

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी उद्या शनिवारी आणि परवा रविवारीदेखील अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 17 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.