
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्राधिकरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. यात महसूल आयुक्तांना प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष करण्यात आले आहे. नाशिक जिल्हाधिकारी व विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील. कुंभमेळ्यासाठी नेमण्यात येणारे स्वतंत्र आयुक्त हे सदस्य सचिव राहणार आहेत. दर तीन महिन्यांतून किमान एकदा प्राधिकरणाची बैठक होईल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात येणाऱ्या मंत्री समितीच्या सल्ल्याने प्राधिकरणाचे कामकाज चालणार आहे हे विशेष.
प्राधिकरणातील अधिकारी
अध्यक्ष- महसूल आयुक्तः उपाध्यक्ष-जिल्हाधिकारी (नाशिक), विशेष पोलीस महानिरीक्षक; सदस्य सचिव- कुंभमेळा आयुक्त; पदसिद्ध सदस्य जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), महानगर आयुक्त (नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), पोलीस आयुक्त (नाशिक शहर), पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), महापालिका आयुक्त (नाशिक), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, नाशिक), मुख्याधिकारी (त्र्यंबकेश्वर नगर परिषद), विभागीय नियंत्रक (महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ) आदींचा समावेश आहे.
स्वतंत्र कुंभमेळा आयुक्त
कुंभमेळ्याशी संबंधित असणारे उपक्रम, संलग्न उपक्रम आदी कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच बांधकामे व प्रकल्पाची कामे करून घेण्यासाठी कुंभमेळा योजना आखण्यात येणार आहे. यासाठी आयएएस अधिकाऱ्याची कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
कुंभमेळा मंत्री समिती गठीत होणार
प्राधिकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामांचा आढावा घेऊन सूचना करण्यासाठी कुंभमेळ्याकरिता स्वतंत्र अशी कुंभमेळा मंत्री समिती गठीत केली जाणार आहे. यात जिल्ह्यातील मंत्री असतीलच; परंतु कुंभमेळा नियोजन व विकासकामांशी संबंधित खात्याचे मंत्रीही यात राहणार आहेत. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांना यापूर्वीच अधिकार देण्यात आले असल्याने या समितीचे सर्वेसर्वा तेच असणार आहेत. उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची या समितीचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असे संबोधणार
‘त्र्यंबकेश्वर-नाशिक’ असा सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख असावा, ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर’ असे संबोधू नये, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील शैवपंथीय साधू-महंतांनी यापूर्वीच केली होती. त्र्यंबकेश्वर हेच सिंहस्थाचे मुख्य स्थान असल्याचा त्यांचा दावा आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने मोठे शहर असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर संबोधणेच योग्य असल्याचे नाशिकमधील वैष्णव साधू-महंत व पुरोहित संघाचे म्हणणे होते. अध्यादेशात ते सरकारने मान्य केले आहे.
खासदारांना डावलले
राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशात मंत्री समिती गठीत करण्याचे सूचित केले आहे. या समितीच्या बैठकांना सत्ताधारी पक्षाचे आमदार स्वतःहून किंवा महाजन यांच्या सूचनेनुसार हजर राहतात. जिल्ह्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे, तर नाशिकमधून शिवसेनेचे राजाभाऊ वाजे खासदार आहेत. अध्यादेशात खासदारांना समितीत सामावून घेण्याबाबतचा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे सरकारने खुबीने या खासदारांना सिंहस्थ सिंहस्थ नियोजनातून डावलल्याचे अधोरेखित होत आहे.
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’ असे संबोधणार
‘त्र्यंबकेश्वर-नाशिक’ असा सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख असावा, ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर’ असे संबोधू नये, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील शैवपंथीय साधू-महंतांनी यापूर्वीच केली होती. त्र्यंबकेश्वर हेच सिंहस्थाचे मुख्य स्थान असल्याचा त्यांचा दावा आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने मोठे शहर असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर संबोधणेच योग्य असल्याचे नाशिकमधील वैष्णव साधू-महंत व पुरोहित संघाचे म्हणणे होते. अध्यादेशात ते सरकारने मान्य केले आहे.