
सामना प्रतिनिधी । मुंबई
यंदाचे वर्ष खासगी शाळा आणि महाविद्यालयांसाठी वीज दरवाढीचे ठरणार आहे. राज्य सरकारने खासगी शाळा-महाविद्यालयांना दिली जाणारी वीज सवलत या वर्षापासून काढून घेतली आहे. याविषयीचे निर्देश ऊर्जा विभागाने बेस्ट, एमएसईबी, टाटा पॉवर, रिलायन्स अशा सर्वच वीज पुरवठा करणाऱया कंपन्यांना दिले आहेत. यामुळे राज्यभरातील खासगी शाळा-महाविद्यालयांना या महिन्याचे येणारे वीज बिल हे वाढीव दराचे असणार आहे.
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी महाविद्यालयांबरोबरच खासगी शाळा आणि महाविद्यालयांना महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम १९५८ अंतर्गत वीज सवलत दिली जात होती, मात्र ही सवलत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम २०१६ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार खासगी शाळा-महाविद्यालयांसाठी असलेली ही ९ ते १८ टक्क्यांपर्यंतची असलेली सवलत रद्द करण्यात आली आहे. सरकारी महाविद्यालये आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांसाठी असलेली वीज सवलत कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विनाअनुदानित खासगी शाळांना बसणार आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या पगाराची सोय लावताना या शाळांची दमछाक होत असताना आता विजेचे वाढीव बिलही भरावे लागणार आहे. याचा परिणाम या शाळांची फीवाढ होणार आहे.
वीज सवलत का कापली?
राज्यभरात खासगी शाळांचे पेव फुटले आहे. या शाळा शैक्षणिक संस्था सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असल्या तरी या शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये नफेखोरीचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर आहे. विद्यार्थ्यांकडून महागडी फी वसूल करणाऱया या शाळा-महाविद्यालयांकडून विजेच्या सवलतीसाठीही अर्ज केला जातो. अशा परिस्थितीत आधीच संकटात असलेल्या ऊर्जा विभागाला याचा आर्थिक भार सोसावा लागतो. यामुळे ऊर्जा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.





























































