Mla Fund – आमदार निधी 1 कोटींनी वाढला, अजित पवार यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांना आपल्या विभागात कराव्या लागणाऱया विकासकामांसाठी महाविकास आघाडीकडून विकास निधीत वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी याविषयीची घोषणा करताना आमदारांना मिळणारा विकास निधी 4 कोटींवरून 5 कोटी करण्याचा निर्णय जाहीर केला. सत्ताधारी बाकावरील आमदारांबरोबरच विरोधी बाकावरील आमदारांनीही बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘आमदारांचा स्थानिक विकास निधी 4 कोटी होता. मी तो 5 कोटी जाहीर करतो. खासदारांना देखील पेंद्राने 5 कोटी निधी द्यायला का कू केली. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
n ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सूतोवाच केले. राज्य सरकारने निर्णय घेतला तर तो फक्त एसजीएसटी असतो. पेंद्र सरकारने निर्णय घेतला तर सीजीएसटीचा निर्णय येतो. त्यामुळे केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला तर तो सर्वच देशांसाठी लागू होईल. हा चित्रपट फक्त महाराष्ट्रात करमुक्त कशाला. असा भेदभाव कशाला,’ असे पवार म्हणाले.

n अर्थसंकल्पातील निधी राष्ट्रवादीने आपल्याकडे वळवला या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सरकार आणायचे तुमचे प्रयत्न सुरू आहेत हे मान्य आहे. पण असे कुठे कधी असते का, असा सवाल करतानाच असा भेदभाव केला तर हे सरकार चार दिवसही टिकणार नाही, असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

n या वर्षी 725 वे समाधी वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव आदी सर्व संत आपले श्रद्धास्थान आहेत. त्या निमित्ताने पालख्या, समाधीस्थळे आदी ठिकाणी जो निधी लागेल तो राज्य सरकार देईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

n आघाडी सरकारने निधीवाटपात विदर्भ-मराठवाडयावर कायम अन्याय केला असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. ती अजित पवार यांनी आकडेवारी देउन खोडून काढली.

केंद्राकडून जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी येणे बाकी

केंद्र सरकारकडून जीएसटीच्या भरपाईपोटी साडेसव्वीस हजार कोटींचा निधी अद्यापही येणे बाकी आहे. जीएसटी भरपाईची पाच वर्षांची मुदत आता या वर्षीच्या 1 जुलैपासून संपते आहे. त्याबाबत पेंद्राने गंभीर विचार करावा अशी आमची भूमिका असल्याचेही पवार म्हणाले.

ड्रायव्हर, पीएचेही पगार वाढवले!

अजित पवार यांनी आमदारांसोबत असणारे पीए आणि त्यांचे ड्रायव्हर या दोघांचेही पगार वाढवल्याचेही जाहीर केले. ‘आमदारांच्या ड्रायव्हरला आत्तापर्यंत 15 हजार रुपये पगार होता, तो आता 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच, आमदारांच्या पीएला 25 हजार रुपये पगार होता, तो आता 30 हजार करण्यात आला आहे,’ असे अजित पवार यांनी जाहीर केले.

विरोधकांना येड पांघरून पेडगावला जायचं होतं का?

विरोधकांकडून इकडच्या तिकडच्या योजना आणल्या. केंद्रातील योजना या अर्थसंकल्पात होत्या असे विरोधक बोलताहेत, पण त्यांना येड पांघरून पेडगावला जायचे होते की त्यांचा अभ्यास कमी होता, असा सवाल अजित पवार यांनी केला.

दादा, गाडी द्या!

अजित पवारांनी आमदार निधी आणि पगारवाढीबाबत घोषणा करताच सत्ताधारी बाकांवरून काही आमदारांनी लागलीच गाडीची मागणी केली. ‘दादा, आता गाडीही हवी’, अशी मागणी अजित पवारांना मागील बाकांवरून ऐकू आली. त्यावर लागलीच अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले, ‘आता आपण इलेक्ट्रिक कारची वाट बघू.. ती कितीला येते, ते बघू आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेऊ.’