कौटुंबिक वादातून टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीच घातल्या गोळ्या, हिंदुस्थानी क्रीडाविश्व हादरले

हरयाणातील गुरुग्राममधील घटनेने आज हिंदुस्थानी क्रीडाविश्व हादरले. राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळी झाडून हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी रागाच्या भरात तिच्यावर तीन गोळय़ा झाडल्या. यात 25 वर्षीय राधिकाला आपला जीव गमवावा लागला. तिच्या  हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास सेक्टर–57 मध्ये ही घटना घडली. याच ठिकाणी राधिका आपल्या कुटुंबासोबत राहात होती. वडिलांशी झालेला वाद विकोपाला पोहोचला आणि त्यांनी परवाना असलेल्या पिस्तुलातून राधिकावर तीन गोळय़ा झाडल्या. यात ती जागीच कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात अपयश आले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठीही पाठवण्यात आला. तसेच गुह्याची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पिता दीपक यादव याला अटक केली. राधिकावर गोळय़ा  झाडण्यात आल्या तेव्हा तिची आईसुद्धा घरात होती, अशी माहिती समोर आली आहे.

रील्सचा वादातून हत्येची शक्यता 

राधिकाला आपला जीव इन्स्टाग्राम रील्स तयार करण्याच्या वादातून गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. राधिकाच्या रील्सबद्दल तिच्या वडिलांना आक्षेप होता आणि त्यांनी याबद्दल नाराजीही दर्शवली होती. रील्सच्या प्रकरणामुळे राधिकाचे खेळावर आणि तिच्या करिअरकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे गुरुवारी दुपारी राधिकाचे तिच्या वडिलांशी कडाक्याचे भांडण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पालिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.