
राज्यात चालू गळीत हंगामात 9 मार्चपर्यंत 1 लाख 12 हजार 7 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे, तर मागील वर्षी याच वेळी 879.21 लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. यंदा 1 हजार 44 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 134 लाख क्टल जादाचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.35 टक्के राहिला आहे. 189 पैकी कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे, तर पुणे, नगर विभागाचा हंगाम एप्रिलअखेर संपण्याची चिन्हे आहेत. हंगाम संपेपर्यंत राज्यात अजून सुमारे 125 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदा कोरोना संसर्गाचे संकट, पाठोपाठ लांबलेला परतीचा पाऊस, ऊसतोड मजुरांची कमतरता, साखरेचे घसरलेले दर, एकरकमी एफआरपी देण्याची कारखान्यांची कसरत अशा संकटांशी तोंड देत, यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू झाला. आतापर्यंत कोल्हापूर विभाग- 232.62 लाख, पुणे विभाग- 204.92 लाख, सोलापूर विभाग- 238.14 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे, तर नगर- 138.99 लाख टन, संभाजीनगर- 86.26 लाख मेट्रिक टन, नांदेड- 99.87 लाख मेट्रिक टन, अमरावती- 7.32, तर नागपूर विभागात 395 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.
साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल
मागील वर्षी राज्याचा 10.35 उतारा होता. तो आता 10.32 टक्के आहे. कोल्हापूर विभागाचा मागील वर्षी 11.89 टक्के असलेला उतारा आता 11.71 आहे. कोल्हापूर विभागाने उताऱयात यंदाही अव्वलस्थान राखले आहे. पुणे विभागात 214.63 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर कोल्हापूर विभाग- 272.41 लाख क्विंटल, सोलापूर- 222.04, नगर- 126.60, संभाजीनगर- 84.12, नांदेड- 104.05, अमरावती- 6.85 आणि नागपूर विभागात 3.95 लाख क्विंटल टन साखरेचे उत्पादन झाले आहे.





























































