राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची तयारी सुरू

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने यंदा 10 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेण्याचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा संघटनांनी फेब्रुवारी महिन्याच्या आतच जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घ्याव्यात, अशा सूचनाही राज्य संघटनेकडून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी वरिष्ठ गट पुरुष/महिला, कुमार गट मुले/मुली व किशोर गट मुले/मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या वर्षी 10 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा घेण्याचा राज्य संघटनेचा मानस आहे. वरीलपैकी एखाद्या गटाच्या स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा असलेल्या जिल्हा संघटनांनी लेखी पत्राद्वारे राज्य संघटनेकडे 31 जानेवारीपूर्वी अर्ज करावा, असे राज्य संघटनेने कळवले आहे.

10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अडचण येऊ नये म्हणून जिल्हा कबड्डी संघटनांनी आपल्या निवड चाचणी स्पर्धा या फेब्रुवारीच्या आतच घ्यायच्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वतयारीला व सराव शिबिरासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास परवानगी दिल्याने राज्य कबड्डी संघटनेने आपल्या रखडलेल्या स्पर्धांच्या आयोजनासाठी तयारी सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या