
महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र आपल्याला विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्वाचा आहे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या 50 व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज असून ते राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य, प्रा.बी.आर.शर्मा उपस्थित होते.
डॉ. माशेलकर यांना जीवनगौरव
विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन 2021 च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ. संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ. देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा. राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. ओमकार सिंग आदींना गौरविण्यात आले.
सरकारी पत्रव्यवहारांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चिन्ह
सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 15 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या 75 आठवडय़ांत 75 कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

























































