
‘बुद्धीची देवता श्री गजानन’ असे म्हटले की, लगेच आठवतात त्यांचे आवडते मोदक. मोदक म्हटले की, विविध प्रकारचे मोदक समोर येतात. तळलेले, खव्या-माव्याचे, उकडीचे. प्रत्येक मोदक प्रकार आणि त्याचा चाहता वर्ग निश्चित आहे. आज आपण उकडीचे मोदक आणि त्याचे फायदे पाहूया.
उकडीचे मोदक – उत्तम सुगरणीला बनवता येणारा हा पदार्थ प्रत्येकाला हाताने बनवायला जमतोच असे नाही. म्हणून त्याचे साचे वापरले जातात. साचे वापरताना मोदकाचे बाहेरील आवरण जाड होणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर मोदक कोरडे आणि पचनास जड होतात. मोदकातील गूळखोबऱयाचे सारण श्रेष्ठ की साखरखोबऱयाचे याबद्दलही बरेच लोक वाद घालत असतात. आपल्यासाठी या कोणत्याही वादात न जाता उकडीच्या मोदकाचे फायदे कसे करून घ्यायचे ते समजणे महत्त्वाचे आहे. असो.
‘उकडीचे मोदक’ या दोन शब्दांत ‘उकडीचे’ या शब्दाला जास्त महत्त्व आहे. उकडीचे म्हणजे उकडून/वाफवून केलेले. तांदळाच्या पिठाची उकड तूप घालून खाण्याची प्रथा महाराष्ट्रात भरपूर जुनी आहे. उकडून केलेले मोदक हे इतर प्रकारच्या मोदकांपेक्षा सहज आणि लवकर पचतात हे लक्षात ठेवावे. म्हणजे पचनाचे विकार असणाऱयांनीसुद्धा उकडीचा मोदक बेताने खाल्ला तर सहज पचू शकतो.
उकडीचे मोदक करताना तांदळाचे पीठ, ओले खोबरे, गूळ किंवा साखर हे मुख्य घटक असतात. वेलची, जायफळही घातले जाते. तांदळाचे पीठ, तेही उकडलेले म्हणजे सर्वात सहज पचणारी आणि शरीराला सहज ताकद देऊन जाणारी वस्तू होय. हृदयास बल देते. अनेक औषधांचे हृदयावरील विषारी परिणाम कमी करते.
ओले खोबरे – हा शरीरातील रस, रक्त, मांस, हाडे आणि मज्जासंस्था यांचे पोषण करणारा उत्तम पदार्थ. ओले खोबरे चावून खाल्ल्याने सर्व प्रकारचे मुखरोग, दंतरोग नष्ट होतात. मुखस्वास्थ्य सुधारते.
गूळ – किमान वर्षभर जुना असेल तरच खावा असा आयुर्वेदाचा गुळाच्या बाबतीतला नियम आहे, नाहीतर गूळ अनेक रोग निर्माण करतो. जुना गूळ रसरक्तमांसवर्धक आहे. त्वरित काम करतो. थकवा लगेच कमी करतो.
साखर – आयुर्वेदास अपेक्षित असते ती खडीसाखर. ही सर्व शरीरपोषक वस्तू आहे, कोणत्याही गोष्टीत सहज मिसळणारी साखर आजकाल फार बदनाम झाली आहे, पण अनेक रोगांचे उत्तम औषधही आहे. तापापासून ते कॅन्सर, एड्स, क्षयरोग वगैरपर्यंत सर्वांमध्ये उपयोगी ठरते.
वेलची – वेलची मनास आल्हाददायक, हृदयास उपयोगी, आणि रक्त, मांस, मज्जा यावर काम करते.
जायफळ – जायफळ मनावर उत्तम काम करते. मन शांत करते. विचार येण्याची गती कमी करते. उत्तम झोप निर्माण करते. शरीरात मांस, मज्जा आणि शुक्रधातूवर काम करते. संभोगशक्ती त्वरित वाढवते.
गाईचे साजूक तूप – पृथ्वीतलावर अमृत म्हणून देवाने माणसाला तूप दिले आहे. शरीर, मन, बुद्धी यावर उपाय करताना आयुर्वेदातसुद्धा तुपाचाच वापर होतो.
एवढय़ा प्रमाणात आणि नियमित मोदक खाल्ले तर वजन खूप वाढते. त्यामुळे एक दिवस आठवडय़ातून जरी खाल्ले तरी हीच कामे उत्तम होतात आणि सोबत व्यायाम केला तर संभोगशक्ती आणि व्याधिप्रतिकार क्षमताही वाढते.
ग्रीष्म आणि वर्षा ऋतूचा जोर उतरला की, अगदी सहज पचून शरीर आणि मनाची ताकद वाढवण्यासाठीचा सर्वोत्तम पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक म्हणूनच श्रावणानंतरच्या या हंगामात खाण्यासाठी आपल्या प्रथेत बसवला आहे हे सिद्ध होते.
अशा प्रकारे ठरतात उपयोगी
l शरीरातील रक्त लगेच वाढते. रक्तातील अतिरिक्त उष्णता लगेच कमी होते.
l त्वचेचे पोषण होऊन लकाकी, तजेला येतो. कांती उजळते.
l शरीरावरील मांसाचे वजन सहज वाढते.
l बुद्धीचे पोषण होऊन ती तल्लख होते. नियमित खाल्ले तर बुद्धी वाढतेसुद्धा, पण त्यासोबत व्यायामही भरपूर करावा लागतो. म्हणजे शरीरही पिळदार बनते.
l मन शांत होते, चिडचिड कमी होते.
l झोप सुधारते, शांत लागते. उठल्यावर प्रसन्न वाटू लागते.
l शीघ्रपतनासारखे त्रास असतील तर उकडीचे मोदक भरपूर साजूक तूप घालून रोज एक खावा. हस्तमैथुन टाळावे. त्वरित फायदा होतो.
l न्यूनगंडातून अनेक लोक बुजरे राहतात आणि स्वतःचे नुकसान करतात. अशा वेळी मनाची ताकद वाढवण्यासाठी उकडीचे मोदक जेवणासह खावेत. मनाला उभारी येते. स्वतःहून व्यक्त होण्याची इच्छासुद्धा हळूहळू निर्माण होऊ लागते. बुद्धीला चालना मिळते.
l शुक्राणूंची संख्या कमी असेल तर उकडीचे मोदक नियमित आहारात ठेवून फायदा होतो. अधिक माहिती आपल्या वैद्याकडून घ्यावी.
l पित्तवाताच्या विकृतींमध्ये शारीरिक थकवा आणि मानसिक उदासीनता, मानसिक दौर्बल्य काही केल्या कमी होत नाही. अशा वेळी उकडीचे मोदक उत्तम काम करतात.
l क्षयरोगी किंवा तीक्ष्ण औषधे चिकित्सारूप दिल्याने ज्यांचे शरीर सुकलेले असेल त्यांना उकडीचे मोदक नियमित द्यावेत. औषधे सहन करण्याची शरीराची शक्ती त्याने सहज आणि लगेच वाढते, चिकित्सेला फायदा होतो.
l उकडीचे मोदक आणि साजूक तूप रोज जेवणासह खाल्ले तर आम्लपित्त कमी होते, रक्ताचे आणि त्वचेचे रोग आटोक्यात येतात.
वैद्य सत्यव्रत नानल
[email protected]



























































