
हेडिंग वाचताच तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पहिल्या डावात 173 धावांनी पिछाडीवर पडलेला हिंदुस्थानचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा विजेता कसा होऊ शकतो? पण हे शक्य आहे. पहिल्या डावात मोठी आघाडी घेत ऑस्ट्रेलिया जेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला असला तरी हिंदुस्थानलाही जेतेपदाची संधी आहे. फक्त दुसऱया डावात हिंदुस्थानी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ दाखवायला हवा. जर असं घडलं तर ते कसोटीचा निकालही फिरवू शकतात. पण हा अंतिम सामना अनिर्णित राखण्यात हिंदुस्थानी फलंदाजांनी यश मिळविले तर हिंदुस्थान जगज्जेता नाही पण संयुक्त विजेता मात्र जरूर होऊ शकतो. सध्याचा खेळ पाहता हिंदुस्थानी संघासाठी जगज्जेतेपदाची संधी जिवंत आहे, असे आपण म्हणू शकतो.
दोन वर्षांपूर्वी साऊदम्पटनला झालेल्या कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातही हिंदुस्थान पहिल्या डावात 217 तर दुसऱया डावात 170 धावांत गारद झाला होता. आता ओव्हलवरही परिस्थिती फारशी वेगळी नाहीय. ऑस्ट्रेलियाने 469 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली तर हिंदुस्थानचा संघ 296 पर्यंतच पोहचू शकला.
उद्या ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 150 धावा जरी केल्या तरी हिंदुस्थानसमोर 325 धावांचे अवघड आव्हान असेल. पण ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात दोनशेचा टप्पा गाठून हिंद्स्थानसमोर चार सत्रात अंदाजे 400 धावांचे आव्हान दिले आणि हिंदुस्थानी फलंदाजांनी चारही सत्रे यशस्वीपणे खेळून काढत सामना अनिर्णित राखला तर या स्पर्धेच्या नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
तसेच पावसामुळे खेळ वाया गेला तर सामना निकाली काढण्यासाठी राखीव दिवसाचा पर्यायही वापरला जाणार आहे. लंडनच्या हवामान खात्याकडून चौथ्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पावसामुळेही कसोटी अनिर्णित राहिली तरी दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान जगज्जेता होतो की संयुक्त जगज्जेता की उपविजेता, हे चौथ्या दिवशी स्पष्ट झालेले असेल.





























































