
सामना प्रतिनिधी, मुंबई
अनंत चतुर्दशीला एक दिवस उरलेला असताना मुंबईतील चौपाटय़ांवर पुन्हा एकदा ‘स्टिंगरे’ हे मासे आढळले आहेत. या माशांनी दंश केल्यास प्रचंड वेदना होत असल्यामुळे रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनावेळी गणेशभक्तांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सन 2013 मध्ये या माशांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर गणेशभक्तांना दंश केल्याची घटना घडली होती.
पाच वर्षांपूर्वी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील चौपाटय़ांवर थैमान घालणारे ‘स्टिंगरे’ मासे पुन्हा एकदा गिरगाव चौपाटीवर आढळले आहेत. गिरगाव चौपाटीवर मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी आणले जातात. यानिमित्ताने लाखो गणेशभक्त समुद्राच्या पाण्यात उतरतात. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतींचे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पावसाळा कमी झाला की ‘स्टिंग रे’ मासा प्रजननासाठी किनाऱ्यावर येतो. यंदाही मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर ‘स्टिंग रे’ मासे आढळून आले आहेत. सन 2013 मध्ये मोठय़ा प्रमाणात ‘स्टिंग रे’ मुंबईच्या चौपाट्यांवर आढळून आले होते. त्यावेळी सुमारे 150 गणेशभक्तांना ‘स्टिंग रे’ माशाने दंश केला होता. आताही पुन्हा एकदा ‘स्टिंग रे’ आढळल्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ‘स्टिंग रे’च्या शेपटीवर चुकून पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता असते.
हा ‘स्टिंग रे’ माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे त्यांच्या शेपटीत न्यूरोटॉक्सिन असते. या माशाचा दंश वेदनादायक असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध चौपाटय़ांवर प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत, सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण गणेशभक्तांनीसुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी. मासे पायाला चावल्यावर त्या भागात जळजळ होत असल्याने ते खाजवू नयेत. त्यामुळे जखम खोल होऊ शकते. याकरिता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
summary-sting ray fish on mumbai seashores



























































