तणावमुक्तीसाठी स्टोक्सचा ‘सिगारेट ब्रेक’ वल्र्डकपवरील नव्या पुस्तकात गौप्यस्फोट

631

इंग्लंड-न्यूझीलंड दरम्यानची वादग्रस्त किताबी लढत… बरोबरीमुळे सुपर ओव्हरपर्यंत ताणलेला सामना… सुपर ओव्हरमध्येही पुन्हा घडलेला बरोबरीचा थरार… आणि सर्वाधिक चौकार मारण्याच्या नियमाने इंग्लंडला मिळालेले जगज्जेतेपद… या क्रिकेटमधील थरारक घटनेला मंगळवारी बरोबर एक वर्ष झालं. या वर्षपूर्तीनिमित्त गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वल्र्डकपवर एक नवं पुस्तक आलं आहे. या पुस्तकात बेन स्टोक्सने सुपर ओव्हरपूर्वी तणावमुक्तीसाठी सिगारेट ओढली होती, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

जेतेपदाच्या लढतीत मोक्याच्या वेळी फटकेबाजी करीत बेन स्टोक्सने न्यूझीलंडच्या घशात गेलेला सामना बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले होते. सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर जगज्जेतेपदाच्या करंडकावर कारकिर्दीत पहिल्यांदाच आपले नाव कोरले. यावरून नंतर मोठा वादही झाला. त्यामुळे आयसीसीला चौकारांच्या निकषाचा निर्णय रद्द करावा लागला. अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू चांगलेच तणावाखाली होते. साहजिकच स्टोक्सवरही हा तणाव होता. मोक्याच्या प्रसंगी स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी स्टोक्सने सुपर ओव्हर ब्रेकमध्ये सिगारेट ओढली होती, असा गौप्यस्फोट ‘मॉर्गन्स मेन : द इनसाईड स्टोरी ऑफ इंग्लंड्स राईज क्रिकेट वल्र्ड कप ह्युमिलिएशन टू ग्लोरी’ या पुस्तकात केला आहे. नील हॉल्ट व स्टिव्ह जेम्स हे या पुस्तकाचे संयुक्त लेखक आहेत.

मैदानात 27 हजारांच्या दरम्यान क्रिकेटशौकिन, टीव्ही कॅमेरे आणि सुपर ओव्हर

मुळे टिपेला गेलेली उत्सुकता या सर्व परिस्थितीत लॉर्ड्स मैदानावर एकांत मिळेल, अशी जागा मिळणं खूप कठीण होतं. मात्र, घरचे मैदान असल्यामुळे बेन स्टोक्सला या मैदानाचा कोपरा अन् कोपरा माहिती होता. कर्णधार इयॉन मॉर्गन आपल्या संघाला शांत करून नवीन रणनिती आखण्यात व्यस्त असताना स्टोक्सने संघापासून वेगळं राहणं पसंत केलं. तब्बल 2 तास 27 मिनिटे फलंदाजी करुन आल्याने तो पूर्णपणे घामाने भिजला होता. अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतरचा तणाव साहजिकच त्याच्यावरही होता. अशावेळी स्टोक्सने संघाच्या ड्रेसिंग रूममागे जाऊन, बाथरूममध्ये जाऊन एक सिगारेट प्यायली आणि स्वतःला तणावमुक्त केलं.’ अशा प्रसंगाचे वर्णन या दोन लेखकांनी आपल्या पुस्तकात केले आहे. बेन स्टोक्सला नाबाद 84 धावांच्या खेळीबद्दल सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याने सुपर ओव्हरमध्येही बहुमोल आठ धावा करून इंग्लंडला पराभवापासून वाचवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या